1. सांगली जिल्ह्यात किती माध्यमिक विद्यालये आहेत आणि मार्च 2023 मध्ये किती विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले?
उत्तर- सांगली जिल्ह्यात681 माध्यमिक विद्यालये आहेत. या शाळांतून दहावीसाठी38 हजार 527 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. जिल्ह्यात 103 परीक्षा केंद्रे आहेत.
2. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातल्या पणूंब्रे वारुण येथील डोंगरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली होती?
उत्तर- सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातल्या पणूंब्रे वारुण येथील 2023 च्या डोंगरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे यांची निवड झाली होती.
3. सर्वाधिक प्रदूषित हवेच्या शहरांमध्ये सांगली शहराचा समावेश आहे काय?
उत्तर- होय. केंदीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नावर खालील प्रमाणे माहिती दिली. देशात 24 राज्यातील 131 शहरे प्रदुषित आहेत. उत्तर प्रदेश मधील 17 शहरे, आंध्रप्रदेश13, पंजाब 9, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, ओडिशा प्रत्येकी सात शहरे प्रदूषित आहेत. महाराष्ट्रातील तब्बल 19 शहरांमध्ये हवेतील प्रदूषणाची पातळी धोक्यावर गेली आहे. यात पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली शहरांचा समावेश आहे. अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सोलापूर, ठाणे, वसई-विरार, उल्हासनगर या शहारांचाही समावेश आहे.
4. बालकाचा शिक्षणाचा अधिकार( आरटीई) अंतर्गत सांगली जिल्ह्यात किती विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळाला आहे?
उत्तर - सांगली जिल्ह्यातील 226 शाळांमध्ये एक हजार 896 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे. शाळेत 25 टक्के प्रवेश या माध्यमातून देण्यात येतात.
5. शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत 2022- 23 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील कोणत्या शिक्षकांना यश मिळाले आहे?
उत्तर- गटशिक्षणाधिकारी अनिस मुसा नायकवडी व खेराडीवांगी येथील शिक्षिका वनिता मोरे यांनी यश मिळाले आहे. नायकवडी यांनी 'विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून मॉडेल स्कूल निर्मिती' हा नवोपक्रम सादर केला. त्यास राज्यातील १० निवडक उपक्रमांतून द्वितीय क्रमांक मिळाला. खेराडेवांगीच्या वनिता मोरे यांनी बाहुली नाट्य: अध्ययन-अध्यापनाचे प्रभावी माध्यम' हा नवोपक्रम सादर केला. त्यास राज्यातील १० निवडक उपक्रमातून प्रथम क्रमांक मिळाला.
6. सांगली गिर्यारोहक तुषार सुभेदार अलीकडेच कोणते सर्वोच्च शिखर सर करण्यात यशस्वी झाला?
उत्तर- आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माउंट किलीमांजारी (19 हजार 341 फूट). 19 फेब्रुवारी2023 रोजी ही कामगिरी केली.
7. सांगलीच्या 'खिडकी' या लघुपटाची कोणत्या फिल्म फेस्टिव्हल अवॉर्डसाठी निवड झाली आहे?
उत्तर- सांगलीच्या 'खिडकी' या लघुपटाची 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्डसाठी निवड झाली. गरीब 'मुस्लिम कुटुंबातील मुलीच्या शिक्षणावर या लघुपटात भाष्य केले आहे. निर्मिती उमेश ढोकणे आणि सुजाता मेंगाने यांची आहे. दिग्दर्शन अमित काटकर यांनी केले आहे. लेखन राजू नदाफ यांचे आहे. लघुपटाचे चित्रीकरण सांगली, मिरज . परिसरात झाले आहे. वीरधवल पाटील यांनी छायाचित्रण केले आहे. लघुपटात रुजवी ढोकणे, तबरेज खान, अँड. जुलेखा मुतवल्ली, अँड. पल्लवी कांते, प्रा, अखलाख ताडे, डॉ. अनुष्का पाटील आणि विशाल दौंडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
8. सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेला अलीकडेच कोणता पुरस्कार मिळाला?
उत्तर- विज पब्लिकेशन कोल्हापूर यांचा बँको ब्ल्यू रिबन 2022 हा पुरस्कार मिळाला आहे.
9.कसा आहे माणदेश जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव?
उत्तर- नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीत सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांचे विभाजन करून माणदेश हा दुष्काळी तालुक्यांचा जिल्हा प्रस्तावित आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी, जत आणि खानापूर, सातारा जिल्ह्यातील माण आणि खटाव, तर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि मंगळवेढा या सहा दुष्काळी तालुक्यांचा मिळून माणदेश जिल्हा निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे.
10. सांगलीतील प्रदूषण रोखण्यासाठी किती कोटींचा आराखडा तयार केला जाणार आहे?
उत्तर- सर्वाधिक प्रदूषित हवेच्या शहरांमध्ये सांगलीचा समावेश आहे. शहरातील धूळ प्रदूषण रोखण्यासाठी ८ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. यातून विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत. पुढील पाच वर्षात प्रदूषण रोखण्यासाठी खासगी एजन्सीमार्फत २५ कोटींचा आराखडा तयार केला जाणार असल्याची माहिती आयुक्त सुनील पवार यांनी दिली.
