Thursday, August 31, 2023

आपली सांगली किती चांगली! भाग 2

© जिल्ह्यात गाय, बैल, वासरू या गोवंशीय जनावरांची संख्या 3 लाख 24 हजार 756 इतकी आहे. सध्या जिल्ह्यात लम्पिची साथ असून दोन महिन्यात 3601 जनावरांना रोगाची लागण झाली असून त्यापैकी 1768 जनावरे बरी झाली आहेत. 1600 जनावरांवर उपचार सुरू आहेत. तर 233 जनावरे या रोगाने दगावली आहेत. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांचे शंभर टक्के लसीकरण करण्यात आले आहे. 

© शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. विलास नेताजी तथा व्ही. एन. शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. दीड वर्षांनंतर विद्यापीठाला पूर्णवेळ कुलसचिव मिळाला आहे. 

© सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात 98 गावांचा समावेश आहे. एकूण भौगोलिक क्षेत्र 69 हजार 561 हेक्टर असून त्यातील एकूण पेरणीलायक क्षेत्र 61 हजार 238 हेक्टर आहे.  बागायती क्षेत्र 48 हजार 960 असून एकूण जिरायती क्षेत्र 8 हजार 540 हेक्टर आहे. शेतकरी खातेदार 1 लाख 51 हजार 777 आहेत.

©  वाळवा तालुक्‍यात साधारण ३० वर्षांपूर्वी ६ हजारांवर बैलजोड्या होत्या. आज फक्त ६०० बैलजोड्या आहेत. २ हजारांवर ट्रॅक्टर आहेत. मळणी यंत्र, कडबा कुट्टी यंत्र, पॉवर टिलर, फवारणी यंत्रांची संख्या प्रचंड वाढली आहे.


आमची सांगली किती चांगली! भाग 1

◆ खानापूर तालुक्यात टेंभू सिंचन योजनांच्या पाण्यामुळे हुकमी चलन मिळवून देणाऱ्या ऊस शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. ढबू, मिरची, टोमॅटोसह अन्य पिकांचे क्षेत्रही वाढले आहे. मुंबई मार्केटसह अन्य ठिकाणी हा माल पाठविला जातो. त्यातून आर्थिक सुबत्ता शेतकऱ्यांना मिळत आहे. या पिकांसह विविध फळबागांचा प्रयोग शेतकरी करत आहेत, तालुक्यात ऊसाची 50 हजार 857 एकर लागवड करण्यात आली आहे. द्राक्षे 1762, आंबा 325, केळी 330, सीताफळ 157, ड्रॅगन फ्रुट 102 आणि सिमला मिरची 60 एकरावर लागवड करण्यात आली आहे. अनियमित पावसामुळे खरीप वाया जात आहे. ज्वारी, कडधान्यांचे उत्पन्न कमी झाले. 

◆ लघु व उच्च दाब वीज ग्राहकांना एप्रिल व मे २०२३ मधील महिन्याच्या वीज बिलांसोबत अतिरिक्‍त सुरक्षा ठेव भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात आले होते. सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यामध्ये ४ लाख ९४ हजार ४८७ ग्राहकांकडे १४१ कोटी ७२ लाख रुपयांची थकबाकी आहे.

◆ 'बीजारोपण ते वृक्षारोपण' अभियांनातर्गत एक लाख रोपे  तयार करण्याचा संकल्प सांगली- मिरज- कुपवाड महापालिका प्रशासनाने केला आहे. यासाठी महापालिका क्षेत्रातील सर्व  शाळांमधील टप्प्याटप्प्याने ५० हजार  विद्यार्थ्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना माती, बियांचा  पुरवठा करण्यात आला आहे. रोपे  तयार झाल्यानंतर महापालिकेच्या रोपवाटीकेमध्ये ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती आयुक्‍त 'सुनिल पवार यांनी दिली. 

◆ बाकू (अझरबैजान) येथे सुरु असलेल्या आयएसएसएफ शुटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत वाळवा तालुक्यातील साखराळे येथील साक्षी अनिल सुर्यवंशी हिच्या टीमने फ्री  पिस्टल ५० मी. इव्हेंट प्रकारात सुवर्णपदक पटकावले. या १५७३ इतका स्कोर करुन उत्तम कामगिरी केली. त्यामुळे सांगली जिल्ह्याची मान उंचावली आहे. साक्षी हिच्या टीममध्ये टियाना व करणदिप कौर यांचा समावेशं होता. साक्षी ही गेली दीड ते दोन वर्ष निवड चाचणी स्पर्धेचा प्रवास करुन वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत पोहचली. ती सध्या इस्लामपूर येथील वाय.सी. कॉलेज मध्ये विज्ञान शाखेतून शिक्षण घेत आहे.ती बी.सी. ए.भाग - २ मध्ये शिकत आहे. 

◆ खानापूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी डॉ. जितेश कदम यांना विधानसभेसाठी साकडे घातले आहे. मात्र जितेश यांचा डोळा सध्या तरी लोकसभेवर दिसत आहे. डॉ. जितेश कदम यांचे आजोळ खानापूर तालुक्‍यात तर गाव कडेगाव तालुक्‍यात आहे. दोन्हीकडच्या आजोबांनी दोन तालुक्‍यात काँग्रेस भक्‍कम ठेवली आणि नेतृत्व केले. सांगलीचे ते जावई  असल्याने दिवंगत मंत्री मदनभाऊ पाटील कुटुंबाचे बळ आणि कार्यकर्त्यांची फळी  लाभली आहे. तरीही दुष्काळी तालुक्यातील युवा नेतृत्त्व म्हणूनच त्यांच्याकडे अपेक्षेने पाहिले जाते. खानापूर तालुक्‍यातीलच आणखी एक इच्छुक आणि डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनाही लोकसभेची उमेदवारी खुणावत आहे, सर्वच पक्षातून ऑफर असल्याचे सांगत त्यांनी अद्याप राजकीय दिशा कोणती? याबाबतची उत्सुकता वाढवल्याने खानापूर तालुक्यातील नेतृत्व जिल्ह्यात चर्चेत आहे. 

Tuesday, March 7, 2023

आमची सांगली किती चांगली!


1. सांगली जिल्ह्यात किती माध्यमिक विद्यालये आहेत आणि मार्च 2023 मध्ये किती विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले?

उत्तर- सांगली जिल्ह्यात681 माध्यमिक विद्यालये आहेत. या शाळांतून दहावीसाठी38 हजार 527 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. जिल्ह्यात 103 परीक्षा केंद्रे आहेत.

2. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातल्या पणूंब्रे वारुण येथील डोंगरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली होती?
उत्तर-  सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातल्या पणूंब्रे वारुण येथील 2023 च्या डोंगरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे यांची निवड झाली होती.

3. सर्वाधिक प्रदूषित हवेच्या शहरांमध्ये सांगली शहराचा समावेश आहे काय?
उत्तर- होय. केंदीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नावर खालील प्रमाणे माहिती दिली. देशात 24 राज्यातील 131 शहरे प्रदुषित आहेत.  उत्तर प्रदेश मधील 17 शहरे, आंध्रप्रदेश13, पंजाब 9, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, ओडिशा प्रत्येकी सात शहरे प्रदूषित आहेत. महाराष्ट्रातील तब्बल 19 शहरांमध्ये हवेतील प्रदूषणाची पातळी धोक्यावर गेली आहे. यात पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली शहरांचा समावेश आहे. अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सोलापूर, ठाणे, वसई-विरार, उल्हासनगर या शहारांचाही समावेश आहे.

4. बालकाचा शिक्षणाचा अधिकार( आरटीई) अंतर्गत सांगली जिल्ह्यात किती विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळाला आहे?
उत्तर - सांगली जिल्ह्यातील 226 शाळांमध्ये एक हजार 896 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे. शाळेत 25 टक्के प्रवेश या माध्यमातून देण्यात येतात.

5. शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत 2022- 23 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील कोणत्या शिक्षकांना यश मिळाले आहे?
उत्तर- गटशिक्षणाधिकारी अनिस मुसा नायकवडी व खेराडीवांगी येथील शिक्षिका वनिता मोरे यांनी यश मिळाले आहे. नायकवडी यांनी 'विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून मॉडेल स्कूल निर्मिती' हा नवोपक्रम सादर  केला. त्यास राज्यातील १० निवडक उपक्रमांतून द्वितीय क्रमांक मिळाला. खेराडेवांगीच्या वनिता मोरे यांनी बाहुली नाट्य: अध्ययन-अध्यापनाचे प्रभावी माध्यम' हा नवोपक्रम सादर केला. त्यास राज्यातील १० निवडक उपक्रमातून प्रथम क्रमांक मिळाला.

6. सांगली गिर्यारोहक तुषार सुभेदार अलीकडेच कोणते सर्वोच्च शिखर सर करण्यात यशस्वी झाला?
उत्तर- आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माउंट किलीमांजारी (19 हजार 341 फूट). 19 फेब्रुवारी2023 रोजी ही कामगिरी केली.

7. सांगलीच्या 'खिडकी' या लघुपटाची कोणत्या फिल्म फेस्टिव्हल अवॉर्डसाठी निवड झाली आहे?
उत्तर- सांगलीच्या 'खिडकी' या लघुपटाची 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्डसाठी निवड झाली. गरीब 'मुस्लिम कुटुंबातील मुलीच्या शिक्षणावर या लघुपटात भाष्य केले आहे. निर्मिती उमेश ढोकणे आणि सुजाता मेंगाने यांची आहे. दिग्दर्शन अमित काटकर यांनी केले आहे. लेखन राजू नदाफ यांचे आहे. लघुपटाचे चित्रीकरण सांगली, मिरज . परिसरात झाले आहे. वीरधवल पाटील यांनी छायाचित्रण केले आहे. लघुपटात रुजवी ढोकणे, तबरेज खान, अँड. जुलेखा मुतवल्ली, अँड. पल्लवी कांते, प्रा, अखलाख ताडे, डॉ. अनुष्का पाटील आणि विशाल दौंडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

8. सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेला अलीकडेच कोणता पुरस्कार मिळाला?
उत्तर- विज पब्लिकेशन कोल्हापूर यांचा बँको ब्ल्यू रिबन 2022 हा पुरस्कार मिळाला आहे.

9.कसा आहे माणदेश जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव?
उत्तर- नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीत सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांचे विभाजन करून माणदेश हा दुष्काळी तालुक्यांचा जिल्हा प्रस्तावित आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी, जत आणि खानापूर, सातारा जिल्ह्यातील माण आणि खटाव, तर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि मंगळवेढा या सहा दुष्काळी तालुक्यांचा मिळून माणदेश जिल्हा निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे.

10. सांगलीतील प्रदूषण रोखण्यासाठी किती कोटींचा आराखडा तयार केला जाणार आहे?
उत्तर- सर्वाधिक प्रदूषित हवेच्या शहरांमध्ये सांगलीचा समावेश आहे. शहरातील धूळ प्रदूषण रोखण्यासाठी ८ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. यातून विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत. पुढील पाच वर्षात प्रदूषण रोखण्यासाठी खासगी एजन्सीमार्फत २५ कोटींचा आराखडा तयार केला जाणार असल्याची माहिती आयुक्त सुनील पवार यांनी  दिली.