◆ खानापूर तालुक्यात टेंभू सिंचन योजनांच्या पाण्यामुळे हुकमी चलन मिळवून देणाऱ्या ऊस शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. ढबू, मिरची, टोमॅटोसह अन्य पिकांचे क्षेत्रही वाढले आहे. मुंबई मार्केटसह अन्य ठिकाणी हा माल पाठविला जातो. त्यातून आर्थिक सुबत्ता शेतकऱ्यांना मिळत आहे. या पिकांसह विविध फळबागांचा प्रयोग शेतकरी करत आहेत, तालुक्यात ऊसाची 50 हजार 857 एकर लागवड करण्यात आली आहे. द्राक्षे 1762, आंबा 325, केळी 330, सीताफळ 157, ड्रॅगन फ्रुट 102 आणि सिमला मिरची 60 एकरावर लागवड करण्यात आली आहे. अनियमित पावसामुळे खरीप वाया जात आहे. ज्वारी, कडधान्यांचे उत्पन्न कमी झाले.
◆ लघु व उच्च दाब वीज ग्राहकांना एप्रिल व मे २०२३ मधील महिन्याच्या वीज बिलांसोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात आले होते. सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यामध्ये ४ लाख ९४ हजार ४८७ ग्राहकांकडे १४१ कोटी ७२ लाख रुपयांची थकबाकी आहे.
◆ 'बीजारोपण ते वृक्षारोपण' अभियांनातर्गत एक लाख रोपे तयार करण्याचा संकल्प सांगली- मिरज- कुपवाड महापालिका प्रशासनाने केला आहे. यासाठी महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांमधील टप्प्याटप्प्याने ५० हजार विद्यार्थ्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना माती, बियांचा पुरवठा करण्यात आला आहे. रोपे तयार झाल्यानंतर महापालिकेच्या रोपवाटीकेमध्ये ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती आयुक्त 'सुनिल पवार यांनी दिली.
◆ बाकू (अझरबैजान) येथे सुरु असलेल्या आयएसएसएफ शुटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत वाळवा तालुक्यातील साखराळे येथील साक्षी अनिल सुर्यवंशी हिच्या टीमने फ्री पिस्टल ५० मी. इव्हेंट प्रकारात सुवर्णपदक पटकावले. या १५७३ इतका स्कोर करुन उत्तम कामगिरी केली. त्यामुळे सांगली जिल्ह्याची मान उंचावली आहे. साक्षी हिच्या टीममध्ये टियाना व करणदिप कौर यांचा समावेशं होता. साक्षी ही गेली दीड ते दोन वर्ष निवड चाचणी स्पर्धेचा प्रवास करुन वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत पोहचली. ती सध्या इस्लामपूर येथील वाय.सी. कॉलेज मध्ये विज्ञान शाखेतून शिक्षण घेत आहे.ती बी.सी. ए.भाग - २ मध्ये शिकत आहे.
◆ खानापूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी डॉ. जितेश कदम यांना विधानसभेसाठी साकडे घातले आहे. मात्र जितेश यांचा डोळा सध्या तरी लोकसभेवर दिसत आहे. डॉ. जितेश कदम यांचे आजोळ खानापूर तालुक्यात तर गाव कडेगाव तालुक्यात आहे. दोन्हीकडच्या आजोबांनी दोन तालुक्यात काँग्रेस भक्कम ठेवली आणि नेतृत्व केले. सांगलीचे ते जावई असल्याने दिवंगत मंत्री मदनभाऊ पाटील कुटुंबाचे बळ आणि कार्यकर्त्यांची फळी लाभली आहे. तरीही दुष्काळी तालुक्यातील युवा नेतृत्त्व म्हणूनच त्यांच्याकडे अपेक्षेने पाहिले जाते. खानापूर तालुक्यातीलच आणखी एक इच्छुक आणि डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनाही लोकसभेची उमेदवारी खुणावत आहे, सर्वच पक्षातून ऑफर असल्याचे सांगत त्यांनी अद्याप राजकीय दिशा कोणती? याबाबतची उत्सुकता वाढवल्याने खानापूर तालुक्यातील नेतृत्व जिल्ह्यात चर्चेत आहे.
No comments:
Post a Comment